माणसं जोडण म्हणजे काय?


 माणसं जोडण म्हणजे काय?  

माणसे जोडणे ही एक कला आहे. आणि जोडलेली माणसे ही आपल्या आयुष्याची पुंजी किंवा संपत्ती असते असे म्हणता येईल.समाजातील, कुटुंबातील, आप्तस्वकीयांतील आपले वागणे - बोलणे, आपले आचार - विचार, आपले आचरण, आपली  इतरांशी संबंध ठेवण्याची हातोटी यावर आपले माणसांशी जुडणे अवलंबून असते. माणसे जोडण्यापेक्षा ती जुडणे जास्त महत्वाचे. त्यात दोन्ही बाजूंचा मान राखला जातो.
आम्ही शाळेत असताना नववी किंवा दहावी ला इंग्रजीचा पहिलाच धडा होता...' गुड मॅनर्स   त्याची व्याख्याच अशी होती.......'आपल्याशी जर कोणी चांगले वागावे असे आपणांस वाटत असेल तर सर्वात प्रथम आपण त्यांच्याशीच चांगले वागले पाहिजे' हे वाक्य त्याच वेळी माझ्या डोक्यात कोरले गेले आहे.माणसे जोडणे म्हणजे फक्त एकत्र करणे नव्हे तर आपले करणे!! नाहीतर   'एक ना धड भाराभर चिंध्या '  असे व्हायचे...अशा जोडण्याला काही अर्थ नसतो.
 माणसे जोडण्यासाठी आपण स्वतः आधी हसतमुख, मनमोकळे व पूर्वग्रहदूषित न राहणे महत्त्वाचे आहे. एखाद्याला सल्ले देताना  त्यांचे ऐकणे, आपण त्यांच्याजागी उभेराहून विचार करणे, त्यांचा स्वाभिमान अबाधित राखून बोलणे, उपकाराची भाषा न करणे असे काही नियम स्वतः ला घालून घेतले पाहिजेत  वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती,  अडीअडचणी नुसार,त्यांच्या विचारसरणी नुसार, त्याच्या बौद्धिक पातळी नुसार, त्यांच्या व्यक्तिगत गरजे नुसार सर्व पैलूंचा विचार करून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना दिलासा वाटेल, समाधान वाटेल अशा पद्धतीने बोलणे ही माणसे जोडण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हणावे लागेल. अर्थात त्यामध्ये कोणताही व्यक्तिगत स्वार्थ, उद्देश , नौटंकी, दिखावा नसावा..!!
माणसे अशी जपावी की त्या प्रत्येकाला त्याची त्याची जागा सुरक्षित आहे असे वाटावे. कारण जास्त जवळ येणारी माणसे आणि जास्त जवळ जाणारी माणसे दोन्ही प्रकार कधीकधी  घातक ठरण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी वेगळे ठेऊनही त्यांच्यात एकत्रतेची जाणीव ठेवणे व त्यांचे महत्त्व कायम राखणे हेही एक कसब आहे.   जोडून ठेवण्यापेक्षा ती टिकवून ठेवण्यासाठी ते महत्वाचे आहे.  अर्थात ती जबाबदारी दोन्ही कडून असते.  काहींना फक्त नेतागिरी करायची असते. आपल्या बरोबर पेक्षा मागेपुढे किती लोकं आहेत ते महत्वाचे वाटते, अशी काही लोकं फक्त डोकी मोजण्यातच धन्यता मानतात. त्यांना माहीत ही नसते त्याच्या बाजूला असलेल्या मध्ये जमलेली किती आणि जोडलेली गेलेली किती !
म्हणून आपण कोणाशी जोडायचे आणि कोणाला आपल्याशी जोडायचे हे आधी नीट ठरवावे. नंतर कोणावर खापर फोडण्यात काय अर्थ ?  ज्यांना फक्त स्तुती करणारी लोकच आपली वाटत असतील  त्यांना काय बोलावे ? त्यांच्या पदरी निराशाच येणार. आणि ज्यांच्या स्वभावातच लबाडी अथवा ढोंग आहे त्यांना  तुपात तळा नाहीतर साखरेत घोळा...पालथ्या घड्यावर पाणी ...!!
 शेवटी आपण जोडलेली माणसे असतात हीच आपली ' संपत्ती '...बाकी सर्व   'पैसा'....येतो आणि जातो.....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.